महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे.
शिवराय हे अभिषिक्त राजे नसल्याचे अनेक व्यावहारिक तोटे महाराजांना व त्यांच्या साथीदारांना जाणवत होते. शिवाजीराजांनी अनेक जमिनींवर स्वामित्व स्थापन केलेले असले आणि अपार धन मिळविले असले तरी; त्यांच्याजवळ मजबूत लष्कर आणि नौदल असले आणि असंख्य सैनिकांवर त्यांचा हुकूम चालत असला तरी सैद्धांतिकदृष्ट्या त्यांची स्थिती ही राजासारखी किंवा सम्राटासारखी नव्हती. मुघल सम्राटाच्या लेखी ते एक जमीनदार होते; आदिलशहासाठी ते एका जहागीरदाराचे बंडखोर पुत्र होते कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.
ऐतिहासिक कागदपत्रांवरून हेही स्पष्ट दिसते सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना निर्माण झालेली होती. असे लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते. त्यांच्या लेखी अजूनही शिवाजी भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही राज्याभिषेक गरजेचा होता. औपचारिक राज्याभिषेकामुळे अशा मत्सरी सरदारांना शिवाजी भोसले हे आता छत्रपती आहेत आणि विजापूर व गोवळकोंड्याच्या शहांप्रमाणेच समान दर्जाचे राजे आहेत असा संदेश गेला असता.
महाराष्ट्रातील काही प्रागतिक विचारांची मंडळी त्याकाळी शिवाजी महाराजांकडे हिंदुत्वासाठी लढणारी महान व्यक्ती म्हणून पाहत होती आणि हिंदू धर्मातील एक व्यक्ती छत्रधारी बनून तिने स्वतंत्र बाण्याने राज्य करीत रहावे अशी त्यांची इच्छा होती. हिंदू स्वराज्य उभे राहावे अशी त्यांची इच्छा होती आणि साहजिकच त्यासाठी हिंदू छत्रपतीची गरज होती.
हे ध्येय किंवा स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास एक विचित्र आडकाठी होती. प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती. भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते, तसेच ते ब्राह्मणही नव्हते. अर्थातच या शास्त्रांनुसार भोसले कूळ शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता. शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना 'क्षत्रिय' जाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.
शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची त्यावेळी स्वराज्यास गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. या पंडिताचे टोपणनाव 'गागाभट्ट' असे होते आणि तो तत्कालीन ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होता. सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट शिवाजी भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. त्यांनी भोसले कुळाची वंशावळी मांडून भोसले कूळ हे प्रभू रामचंद्राच्या सूर्य वंशातील शुद्ध क्षत्रिय घराणे आहे हे सिद्ध केले. अशा भक्कम पुराव्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. अर्थात त्यासाठी त्यांनी मोठी दक्षिणाही घेतली. शिवराय आणि त्यांच्या साथीदारांनी साताऱ्यापासून अनेक मैल चालत जाऊन गागाभट्टाचे जंगी स्वागत केले.
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.
त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवर्शन केले. देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली.
दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे,
जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली.याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या.
६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांवर अभिषेक केला.
त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या.
सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.
६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.
दुसरा राज्याभिषेक
गागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी (२४ सप्टेंबर १६७४) रोजी करून घेतला अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये मिळते. अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की “गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत.” त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज-गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा. कारण काहीही असो २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्चात्त्य वखारवाल्यांनी किंवा फारशी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या उल्लेख केलेला आढळत नाही.
Comments
Post a Comment